Tuesday, 28 February 2017

पायी अष्टविनायक दर्शन यात्रा-३

१०जानेवारी- स्नान करुन नुकत्याच काढलेल्या ताज्या दुधाचा छान चहा घेऊन आमची तीन डब्यांची विनोबा एक्सप्रेस निघाली पुढच्या प्रवासाला.कानसळ,पेडली येथे चहा-बिस्किटे खाऊन पुढे वाटचाल सुरु केली.भौमसुल,तिवरे,अंबामैयाच्या पुलावर फोटो काढले. किती शांत सुंदर दिसत होती अंबामैया आज.आणि पावसाळ्यात अशी कृद्ध होऊन एखाद्या चवताळलेल्या नागिणी सारखी फोफावत धावते,वाटेत येणारी प्रत्येक चीज गिळंकृत करत सुसाट निघते,कालिमाताच जणू नाव आहेच अंबा.सृजनांची माता दुर्जनांची काली.
        खुरावला फाटा येथे नरेंद्र मोरे यानी चहा दिला.चिवे फाटा येथे जवळच्या लाडू वड्या खाऊन नास्ता केला.मजरेफाटा,वावे,घोड्याचा डोह,येथे शिवाजी महाराजांच्या घोड्याना पाणी पाजत असत.इथुन जवळच सुधागड किल्ला आहे.रासळ,आम्बोले,पाली.आली माझ्या मोरयाचे पाली.
         अकरा वाजले होते.प्रदीप मेहतांच्या दुकानात गेलो,हेच नांदगावला आमची निवास व्यवस्था करणार आहेत.त्यांची पत्नी अर्चना जांभुळपाड्याच्या डॉक्टर भिडे यांची मुलगी माझ्या घरचीच होती एकप्रकारे प्रदीप आमचे जावईच होते.अर्चनाला मला पाहुन खुप आनंद झाला.ती मोठी झाल्यानंतर आमची प्रथमच भेट होत होती.नर्मदे हर. प्रदीपजी नांदगावला राहात नाहीत पण तिथे काम करणारी मुलगी कुटुंबासह तिथेच राहते,ती सर्व करेल व मीही येतोच असे प्रदीपजींनी सांगितले.नर्मदे हर.
        प्रथेप्रमाणे आधी धुंडीविनायकाचे दर्शन घेतले.हा बल्लाळविनायकाचा मोठा भाऊ म्हणून प्रथम दर्शन..नंतर बल्लाळेश्वराला उजवी घालुन आधी अक्का{माझी मोठी बहीण}च्या घरी गेलो.प्रसन्न{अक्काचा नातू}वाटच बघत होता.सॅक ठेवुन मैयाजलाची कुपी,मैय्याजलात मिळालेला बल्लाळेश्वरा सारखाच असलेला मोरया नर्मदा गणपती आणि संकल्पाचा नारळ घेऊन मंदिरात गेलो.नर्मदे हर.
      हा माझा मोरया.माझा लाडका,ज्याच्या जवळ मी माझे मन मोकळे करते,सुखःदुख सांगते,अडचणीत मदत मागते आणि तो ती लगेच देतो.वेळप्रसंगी मी त्याच्याशी कडकडून भांडते,कट्टी सुद्धा घेते पण फारवेळ नाही धरता येत मला अबोला.कसा धरणार?दुसरं आहेच कोंण मला याच्याशिवाय.हां आता काही वर्षापासुन मैयाही मिळाली आहे याच्या जोडीला.पण मोरया अगदी जन्मा पासून माझा असलेला एकमेव देव-सखा-मित्र-हितचिंतक सबकुछ.नर्मदे हर.
       समोर सेवातत्पर असलेल्या उंदीरमामांच्या कानात मी आल्याचा मोरयासाठी निरोप सांगितला आणि गाभार्यात गेलो.मोरयाने मोठ्या मायेने जवळ घेतले हा माझा वैयक्तिक अनुभव आहे.मी नमस्कार केला,अश्रू भरल्या डोळ्याना सगळे धुसर दिसत होते.गुरुजींच्या हातात मैयाजलाची कुपी दिली आणि त्यातील थोडे जल मोरयावर घालायला सांगितले,बहीण-भावाची ती गळाभेट साश्रू नयनानी डोळ्यात साठवून ठेवली.मोरयाचे तीर्थ कुपीतिल मैयाजलात मिसळले.मैयाजलात मला मिळालेल्या मोरयाचा प्रत्यक्ष मोरयाला गुरुजींच्या हस्ते स्पर्श करवून स्पंदने ग्रहीत करवून घेतली.नमस्कार करुन मोरयाला पाठ न दाखवता गाभार्यातून बाहेर आलो.अथर्वशीर्ष म्हणत मंदिरा बाहेरुन प्रदक्षिणा घातली.नर्मदे हर.
        अक्काच्या घरी गेलो.प्रसन्नला आम्हाला काय आणि किती सांगू असे झाले होते.नुसता चिवचिवाट चालला होता त्याचा.तो लहान मुलगा नाही बरं नुकतीच पी.एच. डी.केली आहे त्याने.माझा भाचा राजाभाऊ जास्त लहान नाही माझ्यापेक्षा तोही सेवानिवृत्त आहे.आता पौराहित्य करतो.मी आणलेले लाडू प्रसन्नला खाऊ म्हणून दिले.तेवढ्यात राजा आला,नमस्कार करुन म्हणाला,मावशी! कमाल आहे तुमची चालत करत आहात अष्टविनायक दर्शन.माझे तर गुढगे दुखतात.अरे!चालत नाहीस म्हणून गुढगे दुखतात.चालाल तर स्वस्थ राहाल हे लक्षात ठेवले पाहिजे.नर्मदे हर! प्रसादालयात जाऊन भोजनप्रसाद ग्रहण करुन पुन्हा घरी आलो,सॅक उचलून पुढे जायला सज्ज झालो तेव्हा दुपारचा एक वाजला होता.
        बाहेरुन पुन्हा मोरयाचे आणि कळसाचे दर्शन घेऊन पुढे निघालो.नेहेमीप्रमाणे राजा रडवेला झाला होता आणि माझीही अवस्था काही वेगळी नव्हती.आम्ही फक्त मावशी आणि भाचाच नाही तर बालमित्रही आहोत.अक्का माझी मोठी बहीणच नव्हती तर जणू माझी आईच होती.नर्मदे हर!
        झापफाटा,वावळोली,उन्हाचा तडाखा भयानक होता.तहानेने जीव व्याकुळ झाला होता,सौ.ज्योति गडगे हिच्या टपरीत बसलो,थंडगारपाणी पिवून खूप बरे वाटले,पाण्याला जीवन असे म्हटलेले अगदी सार्थ आहे.नर्मदे हर.सिद्धेश्वर-डोंगरावरील मंदिर बंद होते.पुढे एकवीसगणपती मंदिर आहे तेही बंदच होते.अदसुळ येथे एका झाडाखाली बसून पांच मिनिटे विश्रांति घेतली पण जास्त बसून चालणार नव्हते पालिहुन फक्त पाचच कि.मि. आलो होतो आणि अजुन पांच कि.मि. जायचे होते.आणि रस्ता घाटाचा होता.नर्मदे हर!
       शरदवाडीफाटा,पाच्छापुरफाटा,आता जंगल सुरु झाले होते आणि खडी चढणही दमून थांबलो.निघणार इतक्यात प्रदीप मेहताजी आले,नांदगावलाच निघाले होते,त्यानी आमच्या सॅक गाडीतून पुढे नेल्या,ओझे हलके झाले.थोड्याच वेळात घाट उतरणे सुरु झाले. गोगुलवाडी,पोटलस,नांदगाव आले तेव्हा संध्याकाळचे पांच वाजले होते.नर्मदे हर!
       प्रदीप मेहतांच्या घरी आलो.प्रथम दुकानात बसलो पाणि वगैरे पिवून मागेच असलेल्या त्यांच्या घरात गेलो.इथे राहणारी सौ. दक्षता आणि मुले गॅदरिंगसाठी शाळेत गेली होती,इथे अंथरूण-पांघरूण फारसे दिसत नव्हते,आमची पथारी उलगडली आणि दमला देह अक्षरशः तिच्यावर सांडला.सात वाजता दक्षता आणि मुलगी दिव्या मुलगा विनायक आले.मोठी गोड आहेत मुलं.मोरया मैया सुखी ठेवो त्याना.रात्री छान भोजनप्रसाद मिळाला.प्रदीपही थांबले होते भोजनासाठी मग गेले घरी पालीला.आता विश्रांति.नर्मदे हर!









Tuesday, 21 February 2017

अष्टविनायक पदयात्रा.

नर्मदे हर हर. पायी अष्टविनायक यात्रा. ८ जानेवारी २०१७ - पहाटे तीन वाजता उठलो,स्नान पुजा होईपर्यंत यांचा मित्र अरविंद देशपांडे गाडी घेउन आला.रवि पवारच्या घरी गेलो तिथून नाशिकरोड स्टेशनवर गेलो.आमची गाडी भुसावळ-पुणे हुतात्मा एक्सप्रेस नेहेमीप्रमाणे लेट आली,५-३०ला सुटली.१०-३०ला कर्जतला पोहोचलो.लगेच १०-५०ची खोपोली लोकल मिळाली,११-३०ला खोपोली येथे पोहोचलो.बसस्टॅण्डवर गेलो पनवेल बस लगेच मिळाली,महड फाट्यावर उतरुन रिक्षाने वरदविनायक मंदिराजवळ गेलो.भक्तनिवासाच्या नुतनिकरणाचे काम चालु होते,म्हणुनच गेला महिनाभर आम्ही फोन करत होतो पण लागत नव्हता.अर्थात रुम मिळाली नाही.आम्ही मागे आलो असताना ज्या विश्वशांति लॉज मध्ये उतरलो होतो तिथे गेलो पण रुम मिळाली नाही.मोरया! मैया! प्रथम ग्रासे मक्षिका पातः असे नको होऊ देऊ अशी प्रार्थना करुन बाहेरुनच वरदविनायकाचे दर्शन घेतले कारण गर्दी खुप होती.माझ्या माहेरचे पनवेलचे तट्टू गुरुजींचा पत्ता विचारुन त्यांच्या घरी गेलो.माझ्या वडिलांचे मित्र असलेले गुरुजी अपेक्षेप्रमाणे हयात नव्हते पण त्यांचे बंधु आणि पुतणे आणि कुटुंबीय आहेत. अशोक गुरुजींनी श्रीकृपा लॉजला फोन करुन आम्हाला रुम देण्यास सांगितले.व उद्या संकल्प पुजा सांगण्याचे कबुल केले.फक्त नारळ आणायला सांगितले,दक्षिणा यथाशक्ति द्या म्हणाले.नर्मदे हर.श्रीकृपा लॉजमधे गेेेलो रुम घेतली.आज रविवार असल्याने खुप गर्दी होती दर्शन होणे दुरापस्त होते.म्हणुन कळस दर्शन घेतले.संध्याकाळी तलावपाळीवर जाऊन विठ्ठल-रखुमाई,श्रीदत्त दर्शन घेतले.थोडे फोटो काढले.भोजन करुन आता विश्रांति.नर्मदे हर. भाग दुसरा९ जानेवारी २०१७- पहाटे उठून सर्व आवरुन देवळात गेलो.वरदविनायकाचे प्रसन्न झाले. आमची पायी अष्टविनायक दर्शन यात्रा निर्विघ्नपणे होऊ दे अशी प्रार्थना केली आणि प्रदक्षिणा घातली. तोवर अशोक गुरुजी आले.त्यांनी संकल्पपुजा सांगितली आणि विश्वशांति साथी आम्ही ही पायी अष्टविनायक दर्शनयात्रा करण्याचा संकल्प करत आहोत असा संकल्प सांगुन नारळाचा श्रींच्या पायाला स्पर्श करुन आम्हाला दिला आणि प्रत्येक गणेशाचा त्याला पदस्पर्श करवुन तोच नारळ महडला परत आणायला सांगितले.आमच्या मनात असलेला संकल्प आम्ही त्याना न सांगताही त्यानी आमच्याकडून करवून घेतला. मोरयाला उजवी घालुन प्रथम गुरुजींच्या घरी गेलो.तिथूनच आमचा पुढचा मार्ग होता.वहिनींनी दिलेला चहा घेउन,मोठ्या काकाना नमस्कार करुन मार्गक्रमणा सुरु केली.नर्मदे हर. ताकई,या गावाला धाकटी पंढरी म्हणतात.तिथे पुंडलिकाचे मंदिर आहे.साजगाव,येथे जुन्या मुंबई-पुणे हायवेला आलो.डावीकडे पुणेआणि उजवीकडे मुंबई होते.पाली फाट्यावर जाण्यासाठी आम्ही उजवीकडे वळलो.तिथे भेटलेल्या आशिष कदम याने आमचा फोटो काढला.भर रस्त्यात आम्हाला नमस्कार केला.नर्मदे हर!सारसन येथे टपरीवर चहा घेतला.तिथे असलेल्या लोकांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या.पुढे एक्सप्रेस वे आला तो क्रॉस करुन पाली फाट्यावर आलो.डावीकडे खोपोली उजवीकडे पेण आणि समोरचा रस्ता पालीला जाणारा,आम्ही समोर चालू लागलो. देवन्हावे येथे नितिन चौधरी यांनी घरात बोलावले,सर्वानी नमस्कार केला,चहा बिस्किटे दिली. आज मुक्काम करा उद्या पुढे जा असा आग्रह करत होते.त्यांच्या घरी निवासव्यवस्था होईल कितिही माणसे असली तरी.नर्मदे हर. पुढे ठाणेन्हावे,सांदडा,मिरगुटवाडी,मग आला सांगडी घाट.थोडं दमायला झालं,कोकणतडका हॉटेलमध्ये बसलो,चहा घेतला. चला पुढे इतक्यातच दमून कसे चालेल? हो ना?उंबरे,उंबरखिंड येथे महाकाली,हनुमान मंदिराच्या प्रांगणात बसलो.येथेही मुक्काम करता येईल.शेवंताबाई साळुंके यांनी पाणी दिले ओली हळकुंडेही दिली.नर्मदे हर! तुकसई,दुरशेत,सुरांडा,नानोसे,दुधानेवाडी,कासारवाडीफाटा,परळी नंतर आला जांभुळपाडा.दुपारचे साडेतीन वाजले होते आणि पंचवीस कि.मि.चालणेही झाले होते.म्हणून आज येथेच मुक्काम करणार होतो.स्वामीसमर्थ,साईबाबा मंदिर आहे.तेथे प्रकाश श्रीधर भागवत राहतात,ते पौराहित्य करतात आणि पर्यटकांच्या भोजनाचीही व्यवस्था करतात. माझ्या भावाचे घर आणि यशवंत कृषीपर्यटन केंद्रही येथेच आहे.म्हणुन आम्ही त्याच्याच घरी गेलो.बाबा{माझा मोठा भाऊ} आता नाही पण वहिनी आणि मुले सुना नातवंडे आहेत.खूप वर्षानी मला पाहुन वहिनीला खुपच आनंद झाला.म्हणाली,वन्स!अगदी आहात तशाच आहात अगदी शाळाकॉलेजात असताना होतात तशाच.वहिनी!तू सुद्धा अगदी तशीच आहेस मुलं लहान असताना होतीस तशीच सुंदर चवळीची शेंग.पंचाहत्तरी गाठलेली माझी वहिनी इतकी सुंदर लाजली की पुछो मत.मग लाडक्या नणंदेचं,मेहुण्यांचं स्वागत कसं करु आणि किती करु असं तिला झालं.छान भोजन झालं.आज खुप दमलो होतो,पहिलाच दिवस होता ना.यशवंत कृषिपर्यटनगृहाच्या सेल्फकन्टेंट रुम मधे आता विश्रांति.नर्मदे हर.